0 एमबीएच्या सीईटीसाठी १५ जानेवारीपासून अर्जस्विकृती, तर १५ फेब्रुवारीला सीईटी0

शनिवार, १२ जून, २०१०

मुख्य विषयांमध्ये घसरगुंडी; स्कोअरिंग विषयांत मात्र मुसंडी

आयसीएसई विद्यार्थ्यांच्या भरघोस गुणांचे वैशिष्टय़

आयसीएसई बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेल्या दीप गोयल या विद्यार्थ्यांला योगा व पर्यावरण शिक्षण या दोन विषयांत प्रत्येकी ९२ असे घसघशीत गुण मिळाले आहेत. परंतु, विज्ञान व गणित या विषयांमध्ये त्याला फक्त ८० व ७४ गुण मिळाले आहेत. एकटय़ा गोयलचीच अशी स्थिती नाही. स्कोअरिंग विषयात चांगले गुण मिळविले असताना मुख्य विषयात मात्र घसरगुंडी उडालेले अनेक विद्यार्थी आढळून आले आहेत. ऋचिता धीर हीने योगामध्ये ९४ व पर्यावरण शिक्षणात ८६ गुण मिळविले आहेत, पण गणितात (५२) व अर्थशास्त्रात (७६) तिची घसरगुंडी झाली आहे. शारीरिक शिक्षण (८६) व पर्यावरण शिक्षण (८३) या विषयात उत्तम गुण मिळविणारा रजनीश नायर विज्ञान (५८) व गणितात (४२) मात्र खूपच पिछाडीवर आहे.

या विद्यार्थ्यांच्या (नावात बदल केला आहे) गुणपत्रिकांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर आयसीएसई बोर्ड कशा पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांचे हित सांभाळण्यासाठी गुण‘दाना’चे उदार धोरण राबवित आहे, याची आश्चर्यकारक माहिती समोर आली. मुख्य विषयांत सरासरीपेक्षा कमी गुण मिळाले तरी दुय्यम दर्जाच्या विषयांमुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी फुगेल, अशा पद्धतीने आयसीएसईने हा अनोखा फॉम्र्यूला शोधून काढला आहे की काय, असाही संशय अभ्यासकांनी व्यक्त केला. एसएससी व आयसीएसईच्या गुणदान पद्धतीमध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. त्यामुळे या दोन्ही विद्यार्थ्यांना एका वर्गात बसविणे म्हणजे शेळ्यांच्या कळपात कोंबडय़ांना सोडण्याचा प्रकार असल्याचीही टीका या अभ्यासकांनी केली.

आयसीएसईमध्ये विषयांची निवड करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे एकाच क्षेत्राशी निगडीत दोन वेगवेगळे विषय घेतलेले विद्यार्थीही आढळून येतात. एका विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत पर्यावरण शिक्षण या विषयात ९० गुण, तर पर्यावरण विज्ञान या विषयात ९५ गुण मिळाले आहेत. पर्यावरण या एकाच क्षेत्राशी निगडीत दोन विषय निवडण्याची उपलब्ध असलेली ही सुविधा अनाकलनीय आहे. याच विद्यार्थ्यांने कमर्शियल अ‍ॅप्लिकेशन या स्कोअरिंग विषयातही ९६ गुण मिळविले आहेत. परंतु, गणित (७८), इंग्रजी (७८), सामाजिक शास्त्र (८६), हिंदी (८३) या विषयात मात्र तो पिछाडीवर आहे. स्कोअरिंग विषयांतील घसघशीत गुणांमुळे या विद्यार्थ्यांची सात विषयांच्या गुणांची टक्केवारी ८६.५७ एवढी होते. त्यातून त्याचे दुय्यम दर्जाचे विषय वगळले तर त्याची टक्केवारी ८४ पर्यंत कमी होते. परंतु, त्याला ‘बेस्ट फाइव्ह’ सूत्र लागू केले तर गणित (७८), इंग्रजी (७८) हे दोन्ही कमी गुण असलेले विषय वगळले जातील व ९६, ९५, ९० असे घसघशीत गुण असलेले दुय्यम दर्जाचे विषय ग्राह्य धरले जातील. त्यामुळे त्याच्या बेस्ट फाइव्ह विषयांची टक्केवारी ९० टक्के एवढी होईल. ७२.५७ टक्के एकूण गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे स्कोअरिंग विषय वगळले असता, त्याची टक्केवारी ६९.२० एवढी होते. परंतु, त्याला बेस्ट फाइव्ह सूत्राचा लाभ दिल्यास ही टक्केवारी ७८.८० पर्यंत फुगेल. ७७.०७ टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे स्कोअरिंग विषय वगळले असता, त्याची टक्केवारी ७२.०८ एवढी होते. मात्र, त्याला ‘बेस्ट फाइव्ह’चा लाभ दिल्यास ही टक्केवारी ८३.०६ एवढी फुगेल असे अभ्यासांती आढळून आले आहे. आयसीएसईचे हे गुण फुगविण्याचे धोरण एसएससीच्या विद्यार्थ्यांच्या मुळावर येणारे आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा मुद्दा न्यायालयात प्रभावीपणे मांडण्याची गरज असल्याचेही या अभ्यासकांनी सांगितले.
बेस्ट फाइव्ह’वर आज बैठक
अकरावी प्रवेशासाठी ‘बेस्ट फाइव्ह’ सूत्र लागू करण्यास आयसीएसई पालकांकडून होत असलेला विरोध दुर्दैवी आहे. त्यामुळे एसएससीच्या विद्यार्थी-पालकांनी एकत्रित यावे, असे आवाहन करीत छात्रभारती संघटनेने रविवारी सायंकाळी पाच वाजता एका बैठकीचे आयोजन केले आहे. परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये ही बैठक होणार असून शिक्षक आमदार कपिल पाटील, फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशनचे अध्यक्ष जयंत जैन, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यां सुजाता गांगुर्डे आदी मान्यवर यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, तज्ज्ञ, कार्यकर्ते यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष भूषण जाधव यांनी केले आहे. उपस्थितांकडून मांडण्यात येणाऱ्या मुद्दय़ांचा विचार करून पुढील कृती कार्यक्रम निश्चित करण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.
राज्य सरकार प्रतिज्ञापत्र सादर करणार
‘बेस्ट फाइव्ह’च्या धोरणाबाबत राज्य सरकार तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून स्वतंत्रपणे प्रतिज्ञापत्र तयार करण्यात येणार असून मंगळवापर्यंत ही प्रतिज्ञापत्रे सादर होण्याची शक्यता आहे. ‘बेस्ट फाइव्ह’चा मुद्दा कशा पद्धतीने न्यायालयात मांडायचा याबाबत राज्य सरकारच्या व मंडळाच्या वकीलांनी कसून तयारी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
समर्थक संघटनाही जाणार न्यायालयात
‘बेस्ट फाइव्ह’ सूत्राच्या समर्थनार्थ राज्य सरकारच्या बाजूने व आयसीएसई पालकांच्या विरोधात ‘फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन’ तसेच ‘पीटीए युनायटेड फोरम’ या दोन्ही संघटना हस्तक्षेप अर्ज (इंटरवीन अ‍ॅप्लिकेशन) दाखल करणार आहेत.

    तक्रार व समस्या

    प्रवेश प्रक्रियेमध्ये अन्याय झाला, संस्थाचालकांनी नियमबाह्य शुल्क आकारले, गुणवान विद्यार्थ्यांना डावलण्यात आले...चिंता करू नका. तुमची तक्रार educationpatra@gmail.com या ई-मेल वर कळवा, आम्ही त्यावर तात्काळ उपाय सूचवू. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल. शिक्षणातील फसवेगिरीला या व्यासपीठाच्या माध्यमातून नक्कीच आळा घालता येईल. गरज आहे ती केवळ तुमच्या मदतीची.

    About This Blog

    About This Blog

      © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

    Back to TOP